ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना ‘जगाची फुफ्फुसे’ असे संबोधतात

ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना ‘जगाची फुफ्फुसे’ असे संबोधतात.

उत्तर :

i) ब्राझील देशात उत्तरेकडील अँमेझाॅन नदीच्या खोऱ्यात प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात.

ii) या वर्षावनांवरील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे (प्राणवायूचे) उत्सर्जन करतात.

iii) या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वनांना ‘जगाची फुफ्फुसे’ असे संबोधतात.

ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे

ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.

उत्तर :

i) कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनांत, गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.

ii) झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खाद्य असते.

iii) ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पॅंटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.

हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते

हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.

उत्तर :

i) हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0° सेपेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात.

ii) अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.

iii) उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते.

पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात

पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात.

उत्तर :

ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या गरजांतून विविध रोजगारांची निर्मिती होते. जसे –

i) त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात.

ii) वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात.

iii) घोडगाडी, रिक्षावाले किंवा अन्य वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात.

iv) पर्यटक विविध वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे हस्तोद्योग, कुटीरोद्योगांना चालना मिळते. हॉटेल व्यवसाय बहरतो.

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

उत्तर :

i) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.

ii) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.

iii) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक विविध ठिकाणी जात असतात.

iv) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात.

त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

उत्तर:

भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे; कारण –

i) आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

ii) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते.

iii) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात.

iv) भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे.

खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते

खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते.

उत्तर :

i) स्पर्धा वा खेळ चालू असताना त्या खेळाचे वर्णन करावे लागते.

ii) खेळाचा इतिहास व खेळाडूंची भूतकाळातील कामगिरी सांगावी लागते.

iii) विविध स्पर्धामधील वैशिष्ट्यपूर्ण घटना सांगाव्या लागतात.

iv) मैदानाचा इतिहास सांगणे आवश्यक असते; तसेच विविध सामन्यांतील विक्रम सांगावे लागतात; तरच त्याचे समालोचन रंजक होते.

म्हणून खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते.

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते

मेजर ध्यानचंद यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हटले जाते

उत्तर :

i) मेजर ध्यानचंद हे त्या वेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते.

ii) त्यांनी 1928, 1932, आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून दिली.

iii) 1932 च्या ऑलिम्पिक त्यांनी अमेरिका व जपानविरुद्ध 25 गोल केले.

iv) आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात 400 च्या वर गोल केले.

म्हणून, त्यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हटले जाते.

खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो

खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो

उत्तर :

मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहासलेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.

i) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.

ii) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.

iii) उत्खननात पॉपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.

iv) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते

विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते

उत्तर :

i) मराठी नाटकांचा उदय कीर्तन, भारुडे, दशावतारी खेळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ यांतून झाला.

ii) लळिते आणि लोकनाट्ये यांत मराठी नाटकांची बीजे रोवली गेली.

iii) १८४३ साली विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला. हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच रचले होते. त्यानंतर महाभारतातील. कथानकावरही त्यांनी नाटक रचले.

iv) गावोगावी दौरे करून आपल्या नाटकांचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामेही तेच करीत असत. नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना विष्णुदास भावे यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांना ‘मराठी रंगभूमीचे जनक’ म्हणून ओळखले जाते.