सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात

सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात.

उत्तर :

i) कक्ष तापमानाला सोडिअम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो.

ii) सोडिअम केरोसीनमध्ये बुडतो व केरोसीनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही. म्हणून सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात.

संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते

संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते.

ii) संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो.

iii) संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

उत्तर :

i) एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो.

ii) दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.

iii) वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरांतून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.

iv) वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावाच लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.

लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते

लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण

i) लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही; तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.

ii) लोकशाहीतील लोकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

iii) भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात. त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते.

ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात

ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

उत्तर :

i) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही.

ii) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.

iii) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.

उत्तर :

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :

i) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.

ii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.

iii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.

iv) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.

ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे

ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.

उत्तर :

i) ब्राझील देशाच्या उत्तर भागात अँमेझाॅन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 25 °से. असते.

ii) अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो.

iii) या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे.

सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे

सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे.

उत्तर :

i) विसाव्या-एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.

ii) प्रत्येक खेळाचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते.

iii) हौशी खेळाडू शिकवण्यासाठी; प्रेक्षक मनोरंजनासाठी आणि निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात.

iv) मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो; त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनांच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

उत्तर :

i) इंग्रजी शिक्षणाचे भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले.

ii) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.

iii) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकरांचे लक्ष वेधले गेले.

iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच, त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत ?

उत्तर :

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर पुढील आव्हाने आहेत –

i) लष्करी राजवटींचा फार मोठा धोका जगभरातील लोकशाही देशांसमोर आहे.

ii) लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या खऱ्या लोकशाहीचा प्रसार करणे.

iii) केवळ राजकीय लोकशाही नव्हे; तर खऱ्या लोकशाहीची अंमलबजावणी करणे.

iv) लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजवणे.