ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

उत्तर :

i) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे 5.6 टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे.

ii) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 2.7 टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते.

iii) ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे

भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.

उत्तर :

i) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ii) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या ‘झूम’ सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये ‘रोका’ या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.

iii) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याची दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन्ही देशांत प्राण्यांच्या काही जाती दुर्मीळ होत आहेत. काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.

भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे

भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

उत्तर :

i) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.

ii) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

iii) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत. भारतात ‘झूम’ यासारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना ‘जगाची फुफ्फुसे’ असे संबोधतात

ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना ‘जगाची फुफ्फुसे’ असे संबोधतात.

उत्तर :

i) ब्राझील देशात उत्तरेकडील अँमेझाॅन नदीच्या खोऱ्यात प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात.

ii) या वर्षावनांवरील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे (प्राणवायूचे) उत्सर्जन करतात.

iii) या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वनांना ‘जगाची फुफ्फुसे’ असे संबोधतात.

ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे

ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.

उत्तर :

i) कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनांत, गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.

ii) झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खाद्य असते.

iii) ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पॅंटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.

हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते

हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.

उत्तर :

i) हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0° सेपेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात.

ii) अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.

iii) उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते.

पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात

पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात.

उत्तर :

ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या गरजांतून विविध रोजगारांची निर्मिती होते. जसे –

i) त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात.

ii) वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात.

iii) घोडगाडी, रिक्षावाले किंवा अन्य वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात.

iv) पर्यटक विविध वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे हस्तोद्योग, कुटीरोद्योगांना चालना मिळते. हॉटेल व्यवसाय बहरतो.

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

उत्तर :

i) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.

ii) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.

iii) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक विविध ठिकाणी जात असतात.

iv) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात.

त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

उत्तर:

भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे; कारण –

i) आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

ii) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते.

iii) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात.

iv) भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे.

खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते

खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते.

उत्तर :

i) स्पर्धा वा खेळ चालू असताना त्या खेळाचे वर्णन करावे लागते.

ii) खेळाचा इतिहास व खेळाडूंची भूतकाळातील कामगिरी सांगावी लागते.

iii) विविध स्पर्धामधील वैशिष्ट्यपूर्ण घटना सांगाव्या लागतात.

iv) मैदानाचा इतिहास सांगणे आवश्यक असते; तसेच विविध सामन्यांतील विक्रम सांगावे लागतात; तरच त्याचे समालोचन रंजक होते.

म्हणून खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते.