भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत ?

उत्तर :

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले –

i) स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत कॉग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता.

ii) 1977 साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी कॉग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.

iii) 1989 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली.

iv) प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.

खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डब्बा वापरणे योग्य ठरते

खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डब्बा वापरणे योग्य ठरते.

उत्तर :

i) जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो. त्याची चव व वास बदलतो.

ii) हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा (Antioxident) वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही.

शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात

शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात

उत्तर :

i) शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा कमी असते.

ii) त्यामुळे हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संघनन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात.

प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो

प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो.

किंवा

सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो.

उत्तर :

i) सूर्याकडून आलेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांत गेले असता सूर्य दिसतो. पृथ्वीभोवती सुमारे 300 km जाडीचे वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते.

ii) अशा वेळी सूर्य क्षितिजाखाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा भास होतो. म्हणून सूर्योदयापूर्वी काही काळ व सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य आपणांस क्षितिजावर दिसतो.

पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शिअम पाण्यावर तरंगते

पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शिअम पाण्यावर तरंगते.

उत्तर :

i) कॅल्शिअमची पाण्यावर कमी तीव्रतेने अभिक्रिया होते, म्हणून बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायू पेट घेण्यास पुरेशी नसते.

ii) अभिक्रियामुळे तयार झालेल्या हायड्रोजन वायूचे बुडबुडे धातूचे पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शिअम धातू तरंगतो.

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?

उत्तर :

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात –

i) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात.

iii) राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते.

iv) भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात ?

उत्तर :

राजकारणाचे गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात –

i) राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व व वर्चस्व वाढते.

ii) निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते.

iii) दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासनव्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो.

iv) सहिष्णुता संपते, यामुळे लोकशाही विकसित होत नाही.

द्रविड मुन्नेत्र कळघम हा राष्ट्रीय पक्ष आहे

द्रविड मुन्नेत्र कळघम हा राष्ट्रीय पक्ष आहे.

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो.

ii) संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो.

iii) द्रविड मुन्नेत्र कळघम हा ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो तमिळनाडू राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे; तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात

किंवा

घड्याळजी घड्याळ दुरुस्त करण्यासाठी विशालक वापरतात

उत्तर :

i) साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या (बहिर्गोल भिंगाच्या) नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते.

ii) वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक (बहिर्गोल भिंग) वापरतात.

दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात

दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात

उत्तर :

i) दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या या लोखंडापासून तयार केलेल्या असतात. लोखंडाची प्रवृत्ती क्षरण होण्याकडे असते.

ii) लोखंडाला रंग दिल्याने हवा किंवा हवेतील आर्द्रता लोखंडाच्या संपर्कात येऊ शकत नाही. म्हणून दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात.