प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो

प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो.

किंवा

सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो.

उत्तर :

i) सूर्याकडून आलेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांत गेले असता सूर्य दिसतो. पृथ्वीभोवती सुमारे 300 km जाडीचे वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते.

ii) अशा वेळी सूर्य क्षितिजाखाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा भास होतो. म्हणून सूर्योदयापूर्वी काही काळ व सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य आपणांस क्षितिजावर दिसतो.

पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शिअम पाण्यावर तरंगते

पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शिअम पाण्यावर तरंगते.

उत्तर :

i) कॅल्शिअमची पाण्यावर कमी तीव्रतेने अभिक्रिया होते, म्हणून बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायू पेट घेण्यास पुरेशी नसते.

ii) अभिक्रियामुळे तयार झालेल्या हायड्रोजन वायूचे बुडबुडे धातूचे पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शिअम धातू तरंगतो.

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?

उत्तर :

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात –

i) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात.

iii) राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते.

iv) भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात ?

उत्तर :

राजकारणाचे गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात –

i) राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व व वर्चस्व वाढते.

ii) निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते.

iii) दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासनव्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो.

iv) सहिष्णुता संपते, यामुळे लोकशाही विकसित होत नाही.

द्रविड मुन्नेत्र कळघम हा राष्ट्रीय पक्ष आहे

द्रविड मुन्नेत्र कळघम हा राष्ट्रीय पक्ष आहे.

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो.

ii) संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो.

iii) द्रविड मुन्नेत्र कळघम हा ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो तमिळनाडू राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे; तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात

किंवा

घड्याळजी घड्याळ दुरुस्त करण्यासाठी विशालक वापरतात

उत्तर :

i) साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या (बहिर्गोल भिंगाच्या) नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते.

ii) वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक (बहिर्गोल भिंग) वापरतात.

दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात

दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात

उत्तर :

i) दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या या लोखंडापासून तयार केलेल्या असतात. लोखंडाची प्रवृत्ती क्षरण होण्याकडे असते.

ii) लोखंडाला रंग दिल्याने हवा किंवा हवेतील आर्द्रता लोखंडाच्या संपर्कात येऊ शकत नाही. म्हणून दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात.

सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात

सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात.

उत्तर :

i) कक्ष तापमानाला सोडिअम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो.

ii) सोडिअम केरोसीनमध्ये बुडतो व केरोसीनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही. म्हणून सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात.

संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते

संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते.

ii) संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो.

iii) संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

उत्तर :

i) एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो.

ii) दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.

iii) वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरांतून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.

iv) वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावाच लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.